मायेची ओल



पीएसआयच्या पोशाखात एक रुबाबदार तरुणी सुजातासमोर येऊन उभी राहिली. घाईगडबडीत जाणारी सुजाता तिला ओळखू शकली नाही. "मला ओळखलं नाही का?" त्या तरुणीने विचारले. "मी भाजीवाली आजीची नात रेवती!" हे ऐकताच सुजाताचे मन भूतकाळात गेले तिला आठवला तो प्रसंग एका भाजीवाल्या आजीच्या भेटीचा.
सुजाता पाटील, एक संवेदनशील लेखिका आणि नामांकित राजर्षी शाहू महाविद्यालयात प्राध्यापिका, भाजी मंडईतून जात असताना, एक आजी तिला हरभऱ्याची भाजी घेण्यासाठी विनंती करत होती. "ताई, हरभऱ्याची भाजी घ्या ना... मी स्वतः शेतातून खुडून आणली आहे." आजीचा चेहरा खूप केविलवाणा दिसत होता. फाटकी साडी, थकलेले हात आणि डोळ्यांतून ओघळणारे अश्रू आजीच्या गरिबीची साक्ष देत होते. सुजाताने ५० रुपयांची भाजी घेतली आणि आजीला पैसे दिले. आजीने ते पैसे कपाळाला लावले आणि म्हणाली, "धन्यवाद ताई, माझी नात रेवती बारावीला आहे, तिचा परीक्षा फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी हे पैसे उपयोगी येतील."
कोरोना काळात आजीचा धंदा बंद पडला. लॉकडाऊन संपल्यानंतर आजी भाजी विकून घर चालवत होती, पण घर चालवणे अवघड जात होते. भाजी विकायला बसल्यावर मध्येच पोलीस येऊन आजीला उठवून लावत असत. आजीची ही परिस्थिती पाहून सुजाताला खूप वाईट वाटले.

आजीच्या शब्दांनी सुजाताच्या मनात विचारांची लाट उसळली. तिला आजीला भाजी विकणे किती गरजेचे आहे, हे तिला जाणवले. दुसऱ्या दिवशी, सुजाता आजीला भेटायला गेली. आजी त्याच ठिकाणी भाजी विकत बसली होती. सुजाताने आजीला विचारले, "आजी, काल तुम्ही म्हणालात, नातीच्या परीक्षा फॉर्मसाठी पैसे हवे आहेत... काय झालं?"
आजीने सुजाताला तिच्या घरी नेले. तिथे रेवती अभ्यास करीत होती. आजीची परिस्थिती खूप बिकट होती. एक छोटीशी झोपडी, तुटलेली छप्पर, घरात ना पुरेसे अन्न ना शिक्षण घेण्यासाठी आवश्यक साहित्य. पण रेवतीच्या डोळ्यांत एक चमक होती, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती. सुजाताला आजीची परिस्थिती पाहून खूप वाईट वाटले.
यावर आजी गहिवरून बोलू लागली, "ताई, काय सांगू तुम्हाला... कोरोनाची पहिली लाट आली आणि हिचे वडील वारले. आम्हाला तेव्हा कळालं आभाळ कोसळणं म्हणजे काय असतं. कसे दिवस काढले आम्हीच जाणतो. त्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि तिची आई पण गेली, तेव्हा तर पायाखालची जमीनच सरकली माझ्या. आता ही म्हातारी काय करणार? कोणाचा आधार नाही आम्हाला." आजीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.
सुजाता घरी गेल्यानंतर तिच्या डोळ्यासमोर सतत आजी येऊ लागली. आजीची ती केविलवाणी अवस्था, तिचे दु:ख सुजाताला चैन पडू देत नव्हते. तिने लगेच आपला नवरा अरविंदला फोन केला आणि आजीच्या परिस्थितीबद्दल सांगितले. अरविंदनेही सुजाताचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले आणि ते दोघेही आजीला मदत करण्यासाठी तयार झाले. दुसऱ्या दिवशी सुजाता पुन्हा आजीला भेटली. आजीने तिला सांगितले की, "आमच्याकडे दोन एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यावर भाजी पिकवून ती विकून आम्ही गुजराण करतो."
सुजाताने आजीला मदत करण्याचा निर्णय घेतला. ती रोज आजीकडून भाजी खरेदी करू लागली. तिने रेवतीच्या शिक्षणाला मदत व्हावी म्हणून तिचा शिक्षणाचा खर्च उचलला. आजीला आणि रेवतीलाही मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य दिसू लागले.
रेवती शाळेत आणि महाविद्यालयात खूप हुशार होती. तिने सुजाता आणि अरविंद यांच्या मदतीमुळे कोणतीही अडचण येऊ न देता आपले शिक्षण पूर्ण केले. ती नेहमी वर्गात पहिली यायची. विविध उपक्रमांमध्ये भाग घ्यायची, वादविवाद स्पर्धांमध्ये बक्षीसे जिंकायची. तिच्या मनात अधिकारी बनून समाजाची सेवा करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे तिने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला आणि कठोर परिश्रमाने ती एक अधिकारी बनली.
रेवती आज एका रुबाबदार पीएसआय अधिकारी बनली होती. तिने सुजाताची मदत कधीच विसरली नव्हती. सुजाताला भेटून तिला खूप आनंद झाला. तिने सुजाताचे पाय धरून तिचे आशीर्वाद घेतले आणि आभार मानले.
आजीच्या भाजी विकण्याच्या धडपडीने आणि सुजाताच्या मायेच्या मदतीने रेवतीने आपले ध्येय साध्य केले. मायेच्या ओलाव्याने एक सुंदर नाते फुलले.
हृदयात ओढ जाणिवेची
ही ओल मायेची....

टिप्पण्या